पुणे : रस्त्याच्या वादातून तिघांना मारहाण | पुढारी

पुणे : रस्त्याच्या वादातून तिघांना मारहाण

मंचर, पुढारी वृत्तसेवा : बेलसरवाडी- निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे शेतातील रस्त्याच्या वादातून महिलेसह पती व दीराला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कल्पना गुलाब गावडे ( वय 52, रा. बेलसरवाडी निरगुडसर, ता. आंबेगाव ) यांनी मंचर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.30) फिर्याद दिली. शेतीशेजारील ज्ञानेश्वर शिवाजी कुरकुटे यांचे सर्व्हे नंबर 82, 83, 101 यामधून रस्त्याबाबत वाद असून तो मंचर प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. शनिवारी (दि.23) सकाळी कल्पना व त्यांचे पती गुलाब गावडे घरी असताना बेलसरवाडी येथील ज्ञानेश्वर कुरकुटे, दत्तात्रय टाव्हरे, तुकाराम कुरकुटे, शांताराम वळसे, भाऊ वळसे, देवराम टाव्हरे, संपत कुरकुटे, संतोष कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, ज्ञानेश्वर कुरकुटे, व त्यांचे सहकारी (सर्व रा. बेलसरवाडी-निरगुडसर, ता.आंबेगाव) जेसीबी घेऊन चालक हे कल्पना गावडेंची जमीन गट नं. 83/4 मध्ये आले. त्यावेळी फिर्यादी तेथे गेल्या असता ज्ञानेश्वर कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, नीलेश कुरकुटे, गणेश टाव्हरे यांनी त्यांना ओढून बाजूला केले. महिलांनीही कल्पना यांना मारहाण केली व रस्त्याचे काम करू लागले.

कल्पना यांचे पती गुलाब गावडे तेथे आले असता ज्ञानेश्वर कुरकुटे, दत्तात्रय कुरकुटे, नीलेश कुरकुटे, गणेश टाव्हरे, संजय कुरकुटे, ज्ञानेश्वर कुरकुटे, संतोष कुरकुटे, विकास कुरकुटे, संदीप टाव्हरे, दिलीप टाव्हरे यांनी त्यांना काठी व गज तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विहिरीत टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीचे दीर दिलीप गावडे आले असता त्यांना खाली पाडून मारहाण केली. तुमचा कायमचा बंदोबस्त करून सर्वांना खड्ड्यात गाडण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. बेकायदेशीररीत्या जमाव जमवून, शिवीगाळ, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button