पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेला 93 टक्के उपस्थिती | पुढारी

पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेला 93 टक्के उपस्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील पुण्यासह सर्व जिल्ह्यांत रविवारी (दि.31) पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. साधारण 93 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीत घेण्यात येते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचा कालावधी बदलण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजीच आयोजित करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेत ही परीक्षा 31 जुलै रोजी घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षा 38 जिल्ह्यांमधील 429 तालुक्यांतील 48 हजार 83 शाळांमध्ये घेण्यात आली.

यामध्ये पाचवीच्या 4 लाख 18 हजार 52 विद्यार्थी आणि आठवीच्या 3 लाख 3 हजार 814 अशा एकूण 7 लाख 21 हजार 866 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील साधारण 93 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.राज्यात कोणतीही तांत्रिक अडचण न येता परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिपाई अशा साधारण 51 हजार 908 जणांनी परीक्षा पार पाडण्यात सहभाग नोंदविला.

पुणे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 60 हजार 226 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पेपर एकसाठी 27 हजार 542 आणि पेपर दोनसाठी 27 हजार 615 अशा 55 हजार 115 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे परीक्षेसाठी 5 हजार 111 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले. तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 29 हजार 972 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पेपर एकसाठी 13 हजार 735 आणि पेपर दोनसाठी 13 हजार 731 अशा एकूण 27 हजार 466 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. त्यामुळे आठवी परीक्षेसाठी 2 हजार 506 विद्यार्थ्यांनी दांडी मारली असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button