नाझरेत 10 टक्के पाणीसाठा; आतापर्यंत केवळ 244 मि.मी. पावसाची नोंद | पुढारी

नाझरेत 10 टक्के पाणीसाठा; आतापर्यंत केवळ 244 मि.मी. पावसाची नोंद

जेजुरी : पुरंदर आणि बारामती तालुक्याची संजीवनी समजल्या जाणार्‍या नाझरे (मल्हार सागर) धरण परिसरात जूनपासून आतापर्यंत केवळ 244 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कर्‍हा नदी वाहू लागल्यामुळे नाझरे धरणात पाणी येत असले, तरी 30 जुलैअखेर केवळ 10 टक्के पाणीसाठा झाला आहे. या पाणीसाठ्यामुळे नाझरे धरणावर अवलंबून असणार्‍या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तात्पुरता प्रश्न मिटला आहे. धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या नाझरे जलाशयावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जवळपास 56 गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक वसाहत, इंडियन सिमलेस कंपनी, पारगाव-माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पारगाव, माळशिरस, वाघापूर, सिंघापूर, गुरोळी, राजेवाडी, आंबळे, पिसर्वे, नायगाव, रिसे, पिसे, कोळविहीरे, मावडी क. प. व इतर गावे, नाझरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नाझरे क. प., नाझरे सुपे, जवळार्जुन, पांडेश्वर आदी गावे तर मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मोरगाव, आंबी, तरडोली, बाबुर्डी, लोणी भापकार,  लोणी माळवाडी, कार्‍हाटी, जळगाव क. प., जळगाव सुपे, कर्‍हावागज, अंजनगाव, ढोलेमळा आदी 56 गावांचा व वाड्या-वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाझरे धरणातून होतो.

सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. पुरंदर तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 496 मिलिमीटर असून, 2020 सालाच्या अगोदर सलग तीन वर्षे सरासरी ओलांडून अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली होती. पुढील दोन महिने पावसाचे असून, सप्टेंबर महिन्यानंतर माघारीच्या मान्सूनकाळात पुरंदरमध्ये चांगला पाऊस होतो.

Back to top button