राज्यात यंदाही उच्चांकी ऊस गाळप अपेक्षित; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती | पुढारी

राज्यात यंदाही उच्चांकी ऊस गाळप अपेक्षित; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात आगामी हंगाम 2022-23 मध्ये उच्चांकी ऊस उपलब्धता अपेक्षित असून सुमारे 1 हजार 413 लाख टनाइतके विक्रमी ऊस गाळप होईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 22 लाख टनांनी अधिक ऊस उत्पादन अपेक्षित आहे. तर साखरेचे सुमारे 138 लाख टन उत्पादनाचा प्राथमिक अंदाज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या साखरेच्या मुख्य संचालकांना त्याबाबतचा अहवाल साखर आयुक्तालयाने नुकताच दाखल केलेला आहे. राज्यात ऊस पिकाखालील एकूण क्षेत्र 14.87 लाख हेक्टरइतके आहे. त्यातून प्रति हेक्टरी 95 टन ऊस उत्पादकता अपेक्षित आहे.

एकूण साखर उत्पादन 138 लाख टन टन होणार असले, तरी इथेनॉलकडे त्याव्यतिरिक्त 12 लाख टन साखर वळविण्यात येईल, असे नियोजन साखर आयुक्तालयाने केलेले आहे. साखरेचा सरासरी साखर उतारा 10.30 टक्के राहील, तर इथेनॉल उत्पादनासह साखर उतारा 11.20 टक्के अपेक्षित आहे. तर हंगामात 203 साखर कारखाने सुरू राहण्याची अपेक्षा आहे. राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे उसाचे क्षेत्र वाढण्यास मदत झालेली आहे. त्यादृष्टिने वेळेत उसाचे गाळप होण्यासाठी 1 ऑक्टोंबरपासून हंगाम सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.

तसेच 15 मेपूर्वी उसाचे संपूर्ण गाळप पूर्ण करण्याची तयारी आयुक्तालय स्तरावर करण्यात येत आहे. गतवर्ष 2021-22 मध्ये राज्यात 1321 लाख टन ऊस गाळप होऊन 137 लाख टनाइतके साखर उत्पादन हाती आले होते. चालूवर्षी साखर कारखान्यांकडून प्राप्त माहिती, कारखान्यांकडे नोंदविण्यात येणारा अपेक्षित ऊस, कृषी विभागाकडून संकलित माहिती आणि उपग्रहाद्वारे प्राप्त माहितीनुसार आगामी हंगाम 2022-23 मध्ये उसाची उपलब्धतेचा प्राथमिक अंदाज निश्चित करण्यात आल्याची माहिती साखर सह संचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली.

मराठवाड्यातील क्षेत्र वाढले
राज्यात उसाचे क्षेत्र प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुमारे 22 लाख टनांनी वाढण्याची अपेक्षा आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्राचे वेळेत गाळप होण्यासाठी अधिकाधिक ऊस तोडणी यंत्राचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. साखर कारखान्यांकडून हार्वेस्टरच्या कर्जाच्या परतफेडीची हमी घेऊन करार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यातून नव्याने 130 हार्वेस्टरची उपलब्धता होईल. पहिले आठशे केन हार्वेस्टर कार्यरत असल्याने एकूण संख्या पुढील हंगामात 930 होईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Back to top button