पुणे : गुणवंतांची यंदाही ‘आयटीआय’ला पसंती | पुढारी

पुणे : गुणवंतांची यंदाही ‘आयटीआय’ला पसंती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आयटीआयसाठी 50 ते 55 टक्के मिळवणारे विद्यार्थीच प्रवेश घेतात, हा समज आता दूर झाला असून, यंदा शतप्रतिशत म्हणजेच 100 टक्के गुण मिळवणार्‍या तब्बल 53 विद्यार्थ्यांचे, तर 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या 73 हजारांवर विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत आहे. त्यामुळे कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याकडे कल वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सरकारी आणि खासगी ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेची अंतिम गुणवत्ता यादी गुरूवारी (दि.28) प्रसिद्ध झाली.

त्यामध्ये 3 लाख 8 हजार 439 विद्यार्थी आहेत. त्यातील 2 लाख 48 हजार 796 विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीसाठी ऑप्शन फॉर्म भरले आहेत. त्यानुसार 100 टक्के गुण मिळालेल्या 53 विद्यार्थ्यांनी, 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या 352 विद्यार्थ्यांनी, 86 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या 3 हजार 599 विद्यार्थ्यांनी, 81 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या 12 हजार 149 विद्यार्थ्यांनी, 76 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या 23 हजार 622 विद्यार्थ्यांनी, 71 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या 33 हजार 470 विद्यार्थ्यांनी, 66 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या 41 हजार 916 विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला आहे.

अशाच प्रकारे 40 टक्क्यांहून कमी केवळ 11 हजार 191 विद्यार्थी सोडले, तर 41 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान 2 लाख 97 हजार 248 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. तर, 30 जुलैपासून यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तसेच, 1 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार आहे.

आयटीआयमध्ये असा आहे कल
मुले – 2 लाख 67 हजार 235
मुली – 41 हजार 198
ट्रान्सजेंडर – 06
एकूण – 3 लाख 8 हजार 439

प्रवेशासाठी 91 अभ्यासक्रम…
‘आयटीआय’ प्रवेशासाठी 91 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 80 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर 11 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांना 11 अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

औद्योगिक मागणीमुळे प्रवेशांत वाढ…
राज्यातील उद्योगांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ‘आयटीआय’ प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्याने अनेक कंपन्यांमध्ये हे विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. शिवाय, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास रोजगार उपलब्ध होत असल्याने निमशहरी, तसेच ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button