औंध येथे अतिक्रमणांवर कारवाई; डीपी रस्त्यावरील दुकाने हटविली | पुढारी

औंध येथे अतिक्रमणांवर कारवाई; डीपी रस्त्यावरील दुकाने हटविली

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: औंध येथील डीपी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गायकवाड पेट्रोल पंपादरम्यान आशियाना पार्क सोसायटीसमोरील रहदारीस व वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या दुकानांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर कोंडी होत असल्याने यासंदर्भात वाहतूक पोलिस विभागाकडून व स्थानिक नागरिकांकडूनही तक्रारी येत होत्या. संबंधित फळभाजी विक्रेत्यांकडून नियमापेक्षा अधिक जागा ताब्यात घेऊन अडथळा निर्माण केला जात होता. यासंदर्भात अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने संबंधित विक्रेत्यांना नोटीसही बजावण्यात आली होती.

परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते व प्राप्त तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरुले यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणच्या अधिकृत फेरीवाल्यांवर अटी व शर्तीच्या भंगानुसार कारवाई करून चार ट्रक माल अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जप्त करण्यात आला. वारंवार अटी व शर्थींचा भंग केल्यामुळे संबंधित फेरीवाल्यांचे परवाने, प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई चालू करण्यात आल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.उपायुक्त नितीन उदास व अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

Back to top button