लोणी काळभोर : अनेकांच्या स्वप्नाला बसणार मुरड | पुढारी

लोणी काळभोर : अनेकांच्या स्वप्नाला बसणार मुरड

लोणी काळभोर; पुढारी वृत्तसेवा: पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे गेली अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय मंडळीचे लक्ष लागले होते. आपल्या जिल्हा परिषद गटात तसेच पंचायत समिती गणात कोणते आरक्षण पडणार याची धास्ती लागून होती. पूर्व हवेलीतील मोठ्या लोकसंख्येच्या गावात नेमकी काय परिस्थिती असणार हे चित्र आजच्या आरक्षण सोडतीने स्पष्ट झाले. जिल्हा परिषदच्या उरुळी कांचन-सोरतापवाडी व थेऊर-कदमवाकवस्ती या गटात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी, तर लोणी-काळभोर-कुंजीरवाडी गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाडेबोल्हाई-कोरेगाव मूळ या गटात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण घोषित झाले आहे.

त्यामुळे अनेकांच्या जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याच्या स्वप्नाला मुरड बसणार आहे. हवेलीतील पंचायत समिती गणातील आरक्षण हे काहींसाठी संधी तर काहींना हुलकावणीच ठरताना दिसत आहे. यात उरुळीकांचन, सोरतापवाडी, कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी गणात सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर कोरेगाव मूळ व थेऊर गणात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आणि लोणी-काळभोर अनुसूचित जातीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. हवेलीतील पंचायत समिती आरक्षण सोडत ही उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांच्या कार्यालयात काढण्यात आली. या वेळी तहसीलदार तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी शिर्के, नायब तहसीलदार अनिल भोसले आदी उपस्थित होते.

Back to top button