वडगाव शेरी : पूर पावसाचा नव्हे, हा तर सांडपाण्याचा; हरिनगरमधील चित्र | पुढारी

वडगाव शेरी : पूर पावसाचा नव्हे, हा तर सांडपाण्याचा; हरिनगरमधील चित्र

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: परिसरातील हरिनगरमधील नाल्यातील ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ओढ्याला मैलापाण्याचा पूर आला. यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील महापालिकेने दखल घेतली नसल्याचे नागिरकांनी सांगितले. लोहगावातून येणारा ओढा विमाननगर, रामवाडी, हरिनगर मार्ग कल्याणीनगरमध्ये नदीला मिळतो. या ओढ्यातून महापालिकेने ड्रेनेज लाईन टाकली आहे.

हरिनगरला नाल्यामधील दोन ड्रेनेज फुटल्याने ओढ्याला सांडपाण्याचा पूर आला. या पाण्याचे डबके काही ठिकाणी साचले आहे. हरिनगर सोसायटीतील मैदानामध्ये पावसाच्या पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, डासांचा उच्छाद वाढला असून, परिसरात डुक्करांच वावर वाढला आहे. मैलापाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. याबाबत ड्रेनेज विभागाचे अधिकारी सिध्दराम पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या ड्रेनेज लाईनबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. अधिकार्‍यांनी ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, कोणतीही कार्यवाही झाली नाही. याप्रकरणी ऑनलाईन तक्रार केली होती. ती तक्रार काम न करता बंद केली आहे.

                                                  -ऋ षीकेश जाधाव, रहिवासी, हरिनगर

Back to top button