पावसाने भोसरीकरांना झोडपले | पुढारी

पावसाने भोसरीकरांना झोडपले

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरी परिसरात बुधवारी (दि.27) सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होवून जोराचा पावसाला सुुरूवात झाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या भोसरीकरांना या जोराच्या पावसाने झोडपून काढले अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. घरी जाण्याच्या मार्गावर असलेल्या कामगार वर्गाला पावसाचा सामना करावा लागत होता. तसेच भोसरीतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. भोसरी परिसरात बुधवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी वीज व ढगांच्या कडकडाटासह पावसाने भोसरीकरांना झोडपले.

जोरदार पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची ड़बकी परिसरात तयार झाली होती. परिसरातील लांडेवाडी, आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, दिघी रोड, गवळीनगर, शास्त्री चौक, महादेव नगर, गुळवेवस्ती, धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत, जे. पी नगर आदी भागात पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली. परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. यातून मार्ग काढताना नागरिकांना त्रासदायक ठरत होते. अनेक ठिकाणी रास्ते खोदल्याने या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.

तसेच पावसाळ्यात खड्डयात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्यात आदळत होती. तर दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार घडके. तसेच अनेक भागातील चेंबर मधील पाणी रस्त्यावर वाहत होते. पावसामुळे परिसरातील अनेक भागातील वीज गायब झाली होती. भोसरी परिसरातील भागातील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत होते.

Back to top button