पुणे : मेट्रो विस्तारीकरणाचा आराखडा अर्धवट; रामवाडी ते वाघोली मार्गांचा समावेश | पुढारी

पुणे : मेट्रो विस्तारीकरणाचा आराखडा अर्धवट; रामवाडी ते वाघोली मार्गांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील दुसर्‍या टप्प्यातील मेट्रोच्या 82.5 किलोमीटरच्या विस्तारीकरणाचा एकत्रित आराखडा तयार होणे अपेक्षित होते. त्याऐवजी महामेट्रोने हा आराखडा अर्धवटच तयार केला आहे. रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या केवळ 13 किलोमीटरच्या दोन मार्गांचा यात समावेश आहे. या दोन मार्गाच्या विस्तारीकरणासाठीच तीन हजार 357 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महामेट्रोच्या माध्यमातून स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि कोथरूड ते रामवाडी या दोन मार्गांंवर, तर पीएमआरडीएच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.

दरम्यान, राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी महामेट्रोला 82.5 किलोमीटरच्या मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. त्यामध्ये एचसीएमटीआर मार्गावरील 36 किलोमीटरच्या नियो मेट्रोचा समावेश आहे. त्यानुसार, वर्षभरानंतर महामेट्रोने केवळ दोन मार्गाच्या 13 किलोमीटरच्या विस्तारीकरणाचा अहवाल पुणे महापालिकेला सादर केला आहे. उर्वरित 73 किमी मार्गाचा डीपीआर अद्यापही कागदावरच आहे.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 82.5 किलोमीटरच्या एकत्रित मार्गाचा डीपीआर करण्याचे आदेश आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असतानाही अर्धवट अहवाल महामेट्रोकडून का तयार करण्यात आला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे अशा तुकड्या-तुकड्यांमध्ये मेट्रोचा विस्तार केल्यास त्याच्या मंजुरीसाठी मोठा कालावधी लागण्याची भीती असून निधीचाही अतिरिक्त भार पडण्याची शक्यता महापालिकेच्या प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

दुसर्‍या टप्प्यातील प्रस्तावित मेट्रो मार्ग
मार्गिका                        अंतर (किलोमीटरमध्ये)
वनाज ते चांदणी चौक              1.5 किमी
रामवाडी ते वाघोली                 12 किमी
खडकवासला ते स्वारगेट          13 किमी
एसएनडीटी ते वारजे                  8 किमी
स्वारगेट ते हडपसर                   7 किमी
हडपसर ते खराडी                    5 किमी
एचसीएमटीआर (नियोमेट्रो)       36 किमी
एकूण82.                               5 किमी

…असा असेल रामवाडी ते वाघोली मार्ग
रामवाडी ते वाघोली या विस्तारीत मार्गावर एकूण 9 स्टेशन असणार आहेत. त्यात खराडी बायपास, तुळजा भवानी नगर, उबाळेनगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी ही स्टेशन असणार असून, मार्ग एलिव्हेटेड असणार आहे. या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी प्रकल्प पूर्ण होईपर्यंतचा एकूण खर्च 3 हजार 14 कोटी इतका अपेक्षित धरण्यात आला आहे.

वनाज ते चांदणी चौक
वनाज ते चांदणी चौक या मार्गावर दोन स्टेशन असणार आहेत. त्यामध्ये भुसारी कॉलनी व चांदणी चौक यांचा समावेश असून, या मार्गासाठी 314 कोटींचा खर्च येणार आहे.

मेट्रोच्या विस्तारीकरणाचा आराखडा जसा तयार होत आहे, तसा तो महापालिकेकडून सादर केला जात आहे. यामुळे महापालिकेलाही त्यावर काम करता येऊ शकेल. तसेच उर्वरीत मार्गांचा डीपीआर ऑगस्टपर्यंत तयार होईल.
                                                  – हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

 

Back to top button