अंतर्गत, लेखी परीक्षेचे एकत्रित गुणांकन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय | पुढारी

अंतर्गत, लेखी परीक्षेचे एकत्रित गुणांकन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अंतर्गत (इंटर्नल) गुण आणि परीक्षेतील गुण एकत्र करून निकाल लावणार असल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. केवळ यंदाच्या सत्रासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अंतर्गत गुण आणि परीक्षेतील गुण, असे दोन वेगळ्या पद्धतीने गुणांकन करता येते. विद्यार्थी अंतर्गत परीक्षा आणि असाइन्मेंटमध्ये अनुत्तीर्ण झाला, तर त्याला लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अनुत्तीर्ण घोषित केले जाते.

आता तसे न करता दोन्ही प्रकारचे गुणांकन करून एकत्रित निकाल लावण्याचा निर्णय शैक्षणिक परिषदेने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, अंतर्गत गुणांमुळे वर्ष वाया जाण्याचे प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एखादा विद्यार्थी तोंडी परीक्षा, असाइन्मेंटला गैरहजर असेल, तर त्याला या सुविधेचा फायदा मिळणार नाही, हेदेखील शैक्षणिक परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी ‘एकत्रित गुणांकन’ (कंबाइन पासिंग) पद्धत अमलात आणावी, अशी मागणी युवासेनेतर्फे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली होती.

विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत अंतर्गत गुण आणि परीक्षेचे गुण एकत्र करून निकाल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची अशी मागणी असल्याने ती मान्य करण्यात आली आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षांसाठी उपस्थित असणे बंधनकारक आहे.

                        -संजीव सोनावणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गुणांमध्ये समानता यावी, असे विद्यार्थ्यांना वाटत होते. त्याप्रमाणे विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने जो निर्णय घेतला आहे, त्याबाबत विद्यार्थी समाधानी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्णतेचे प्रमाण कमी होईल.
                                                           – कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना

Back to top button