पुणे : पीएमपीकडे आरटीओचे दुर्लक्ष; बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा नाहीच | पुढारी

पुणे : पीएमपीकडे आरटीओचे दुर्लक्ष; बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा नाहीच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीकडून सर्रासपणे बेकायदा सुरू असलेल्या शालेय वाहतुकीकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे. गेली 36 ते 37 वर्षांपासून मोटार वाहन कायद्याचे पालन न करताच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक पीएमपी प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, याबाबत आरटीओकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र स्कूल बस अधिनियम 2011 नुसार शालेय वाहतूक करण्यासाठी विविध नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार अनेक अटी, शर्तींची पूर्तता केल्यावर संबंधित वाहनाला शालेय वाहतुकीचा परवाना देण्यात येतो. मात्र, मोटार वाहन कायद्यातील कोणत्याही अटी- शर्तींची पूर्तता न करता आणि शालेय वाहतुकीचा परवाना न घेताच पीएमपी 36 शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी 56 बसमार्फत सेवा पुरवित आहे.

यामुळे या गाड्यांमधून दररोज प्रवास करणार्‍या जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांची जबाबदारी कोणावर, हा प्रश्न आहे. त्यामुळे आरटीओ आतातरी पीएमपीला मोटार वाहन कायद्यातील नियमांची आठवण करून देणार की अशीच येथून पुढेही पीएमपीची अनधिकृत शालेय वाहतूक सेवा सुरूच राहणार, हे आता पाहावे लागणार आहे.

देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे
शहरातील मध्यवस्तीसह उपनगरीय भागात पीएमपी, एसटीच्या गाड्यांचे मोठे अपघात झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या गाड्यांचा मेंन्टेनन्स वेळेत होणे गरजेचे आहे, तसेच, आयुर्मान संपल्यावर गाडी ‘स्क्रॅप’ होणे देखील गरजेचे आहे. यासोबतच परिवहन अधिकार्‍यांनी या गाड्यांची फिटनेस तपासणी वेळोवेळी करायला हवी. मात्र, या गाड्यांकडे प्रशासकीय यंत्रणांकडून सर्रासपणे दुर्लक्ष होते आणि तांत्रिक कारणामुळे नर्मदा नदीवर घडलेल्या अपघाताप्रमाणे अपघात घडतात.

Back to top button