भामा आसखेड : अतिवृष्टीने सोयाबीनला फटका, टोमॅटोवर करपा | पुढारी

भामा आसखेड : अतिवृष्टीने सोयाबीनला फटका, टोमॅटोवर करपा

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाच्या दुबार पेरणीचे संकट घोंघावत असताना टोमॅटो पिकावर करपा रोगाचे संकट ओढवले आहे. यामुळे खेड तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत पाणी साठल्याने उगवून आलेले सोयाबीन पिवळे पडले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट असताना टोमॅटो पिकावर करपा पडला आहे. त्यामुळे फळ लागवडीचे फूलगळतीचे प्रमाण जवळपास 70 ते 80 टक्के आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्या वेळी शासनाने पंचनामे करून अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही, ही वस्तुस्थिती असताना यावर्षीदेखील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सध्या टोमॅटोला त्रासदायक वातावरण असून पिकांवर करपा व पानांवर आकसा कीड तसेच सतत पावसाने फुलगळती होत असल्याने उत्पादनात घट होणार आहे.

करपा, आकसा रोगावर कीटकनाशक आणि फुलगळती रोखण्यासाठी औषधांच्या किमती महाग असल्याने शेतकर्‍यांना परवडणार्‍या नाहीत. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे होऊनसुद्धा नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. भरपाई मिळण्याची आसखेड बुद्रुक ग्रामस्थ वाट पाहत आहेत, असे प्रगतिशील शेतकरी बाबाजी सोंडेकर यांनी सांगितले.

Back to top button