भवानीनगर : युवकांनी गरजूंना मदत करावी : दत्तात्रय भरणे | पुढारी

भवानीनगर : युवकांनी गरजूंना मदत करावी : दत्तात्रय भरणे

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: ज्याचं पोट भरलंय त्यांना केलेल्या मदतीचे काहीही वाटत नाही; परंतु ज्याला खर्‍या अर्थाने मदतीची गरज आहे, त्याला मदत केल्यानंतर तो मदत करणार्‍याला कधीही विसरत नाही, असे मत माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. श्री छत्रपती कारखान्याचे संचालक गणेश झगडे व सौरभ झगडे यांच्या आधार यूथ फाउंडेशनच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसर-बेलवाडी जिल्हा परिषद गटातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दहा हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. या वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ भरणे यांच्या हस्ते पवारवाडी येथे करण्यात आला.

या वेळी श्री छत्रपती कारखान्याचे संचालक गणेश झगडे, सौरभ झगडे, विनोद सपकळ, सुमित यादव, बापूराव खरात, सतीश चव्हाण, प्रमोद थोरात, दिलीप थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते. भरणे म्हणाले, “आजच्या अडचणीच्या काळामध्ये सौरभ झगडे यांनी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. काम तर सगळेच करतात; परंतु एखाद्या शिक्षकाने जर संस्कारमय शिक्षण दिले, तर ते विद्यार्थी त्या शिक्षकाला कधीही विसरत नाहीत. देवाला माणसात शोधा म्हणजे आयुष्याचे सार्थक होईल, असेदेखील भरणे या वेळी म्हणाले.” छत्रपती कारखान्याचे संचालक गणेश झगडे म्हणाले, ‘भरणे हे कधीही जातीपातीचे राजकारण करत नाहीत. त्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे.’

Back to top button