खेडच्या पश्चिम भागात भात लावणीला वेग; शेतकर्‍यांची रोपांसाठी होते वणवण | पुढारी

खेडच्या पश्चिम भागात भात लावणीला वेग; शेतकर्‍यांची रोपांसाठी होते वणवण

वाडा, पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यात पश्चिम भागात पावसाने उसंत दिल्याने आता बळीराजाने भात लावणीसाठी वेग दिला आहे. गेले काही दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला असून, शेतकरी शेतीकामात व्यस्त झाला आहे. खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. जवळपास 3200 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जात असून, दरवर्षी सरासरी 2900 ते 3100 मिलीमीटर पाऊस पडतो.

गेले 8 दिवसांपासून चालू असलेल्या पावसाने उसंत दिल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. मागील आठवड्याभरात पडलेल्या पावसाने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे सगळीकडेच भात लावणीची लगबग चालू झाली आहे. भलरीच्या चालीवर महिलावर्ग भात लागवड करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, सर्वत्र भात लावणीला वेग आल्याने लागवडीसाठी शेतकर्‍यांना मजूर टंचाई भासू लागली आहे. भात लागवड सुरू असलेल्या क्षेत्रावर कृषी विभागाच्या वतीने चारसूत्री पद्धतीने लागवडीची माहिती व प्रात्यक्षिक पश्चिम भागातील कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक शेतकर्‍यांना व मजुरांना देत आहे.

भातासाठी पूरक व पोषक पाऊस न झाल्याने रोपे पाण्यात सडली, तसेच रोपे पिवळी पडून रोपांची पूरक अशी वाढ झाली नाही. यामुळे परिसरात रोपांचा तुटवडा जाणवू लागला आहे. रोपे मिळवण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ होताना दिसून येत आहे. पारंपरिक लागवडीबरोबरच चारसूत्री भाताची लागवड करत असून, सोबत युरिया ब्रिकेट (गोळी खत) वापरल्याने गेल्या काही वर्षांत उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे शेतकरी संतोष पोखरकर यांनी सांगितले.

युरिया ब्रिकेटची मागणी जास्त असल्याने आम्ही गेली दोन वर्ष सातत्य ठेवून 60:40 (युरिया + डी.ए.पी) बनवत आहोत. शेतकर्‍यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून, उत्पन्नात मोठी वाढ झालेली असल्याने मागणीत वाढ झाली आहे.
सतीश जैद, कृषिराज युरिया ब्रिकेट, गुंडाळवाडी

Back to top button