पुणे : नारळाने खाल्ला भाव; आखाडातील धार्मिक कार्यक्रमांमुळे मागणी वाढली | पुढारी

पुणे : नारळाने खाल्ला भाव; आखाडातील धार्मिक कार्यक्रमांमुळे मागणी वाढली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आखाड महिन्यातील धार्मिक कार्यक्रमांमुळे बाजारात नारळाला मागणी वाढली आहे. मात्र, नारळ उत्पादक क्षेत्र असलेल्या दक्षिण भारतात पाऊस सुरू असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात नारळाची आवक घटल्याने नारळाच्या भावात शेकड्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या नारळाच्या एक नगाची 20 ते 30 रुपयांना विक्री होत आहे. शहरातील बाजारपेठेत तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येथून नारळाची आवक होते. दररोज 8 ते 10 ट्रकमधून अडीच ते तीन हजार पोत्यांमधून अडीच ते तीन लाख नारळ बाजारात दाखल होतात.

मागील काही दिवसांपासून तामिळनाडू, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश येथे पाऊस सुरू असल्याने नारळ तोडणीस अडथळा येत आहे. त्यात कामगारांची संख्याही कमी असल्याने नारळाची तोड व त्याची वाहतूक करण्यास अडचणी येत आहे. त्यातच देशभरातून नारळाला मागणी मोठी आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे नारळाच्या भावात तेजी आली आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते. उत्सवांच्या निमित्ताने पूजेपासून ते सत्कारापर्यंत आणि मिठाईपासून घरगुती वापरापर्यंत नारळाची आवश्यकता भासते.

सध्या बाजारात चार प्रकारचे नारळ उपलब्ध असतात. तामिळनाडूचा नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो, तर आंध्र प्रदेशातील पालकोल, तसेच मद्रास नारळास किराणा दुकानदारांकडून मोठी मागणी असते. हा नारळ घराघरांत स्वयंपाकासाठी वापरला जातो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक खानावळ, केटरिंग व्यवसायाकडून या नारळाला मोठी मागणी असते.

घाऊक बाजारातील
नारळाचे शेकड्याचे भाव
नवा : 1200 ते 1400 रुपये
पालकोल : 1450 ते 1600 रुपये
सापसोल : 1500 ते 2500रुपये
मद्रास : 2500 ते 2600 रुपये

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव; तसेच हॉटेल व्यवसाय आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. त्यामुळे नारळाच्या मागणीत वाढ होत आहे. आखाडापासून सुरू झालेली ही मागणी दिवाळीपर्यंत कायम राहील. गणपती, नवरात्र, नारळी पौर्णिमा याकाळात त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
                                                                       – दीपक बोरा, नारळाचे व्यापारी.`

Back to top button