‘पुणे-नाशिक रेल्वे फास्ट ट्रॅकवर घ्या’ | पुढारी

‘पुणे-नाशिक रेल्वे फास्ट ट्रॅकवर घ्या’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लक्ष घालावे आणि हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर टाकावा, अशी मागणी खासदार बापट यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पुण्याहून नाशिकला जाण्यास थेट रेल्वे मार्ग नाही. नागरिकांना या प्रवासासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागतो. तो कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवित आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्ग पुणे रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन नाशिक रेल्वे स्टेशन येथे संपेल. मध्य रेल्वेने या प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता दिली असून, रेल्वे मंत्रालयाने खर्चाच्या वाटणीच्या आधारावर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर टाकण्यासाठी रेल्वे मंर्त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी बापट यांनी केली आहे.

Back to top button