पुणे : रेल्वेस्थानकावर आरामदायी सेवा | पुढारी

पुणे : रेल्वेस्थानकावर आरामदायी सेवा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेच्या पुणे स्थानकावरील हेरिटेज इमारतीत प्रवाशांना राहण्यासाठी पाच अलिशान रूमची व्यवस्था ‘आयआरसीटीसी’कडून करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांसाठी विमानतळावरील सेवेप्रमाणे ‘महाराजा एसी सूट’ आणि पंचतारांकित हॉटेल सुविधांसह डिलक्स खासगी खोल्या उघडल्या आहेत. हेरिटेज इमारतीमधील पाच खोल्यांपैकी चार एसी, तर एक नॉन एसी आहे.

या सर्व खोल्या प्रवाशांना 03, 06, 09, 12 आणि 24 तास अशा वेळांसाठी दिल्या जाणार आहेत. सामान्य नॉन-एसी खोलीला तीन तासांसाठी 200 रूपये, तर महाराजा एसी सुटला 24 तासांसाठी अडीच हजार रूपये मोजावे लागणार आहेत. सूटमध्ये संपूर्ण कुटुंबाला राहता येईल, अशी सोय आहे. त्या ठिकाणी केटरिंगबरोबरच इतर सुविधादेखील मिळणार आहेत. या खोल्यांना कळम, चमेली अशा फुलांची नावे देण्यात आली आहेत.

आयआरसीटीसी’ने पुणे स्टेशन येथील जागेत प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नुकतेच येथील खोल्यांचे नूतनीकरण केले आहे. सध्या पाच अलिशान खोल्या प्रवाशांसाठी सुरू केल्या आहेत. या खोल्यांमध्ये आराम, सुरक्षितता, देखावा आणि आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. अलिशान असा महाराजा सुट तयार केला आहे. यामध्ये एक कुटुंब राहू शकते, अशी सोय करण्यात आली आहे.

                                 -पिनाकी मोरावाला, जनसंपर्क आधिकारी, आयआरसीटीसी

Back to top button