पुणे : पित्याकडूनच मुलाचा खून; शवविच्छेदन अहवालानंतर दिली कबुली | पुढारी

पुणे : पित्याकडूनच मुलाचा खून; शवविच्छेदन अहवालानंतर दिली कबुली

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आईला शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या दारुड्या मुलाचा पित्यानेच गळा दाबून खून केल्याची घटना शवविच्छेदन अहवालानंतर समोर आली आहे. पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी नागसेन घोडके (वय 37, रा. बोपोडी, भाऊ पाटील रोड, बोपोडी) याचा मृत्यू झाला, तर नागसेन घोडके (वय 72, रा. बोपोडी) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी नागसेन घोडके हे सनी घोडकेचे वडील आहेत, तर आरोपीच्या पत्नीसह तिघेही बोपोडी परिसरात राहत होते. नागसेन हा मंडप टाकण्याचे काम करीत होता, तर मुलगा कोणतेही काम करीत नव्हता.

घटनेच्या दिवशी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास नागसेनचा मृतदेह बोपोडी येथे आढळून आला होता. त्या वेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर सनीचा मृत्यू हा गंभीर मारहाणीमुळे व गळा दाबून खून केल्यामुळे झाल्याचे अहवालातून समोर आहे. याविषयी त्याच्या वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनीच मुलाचा खून केल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्यांना खून करण्याचे कारण विचारले असता मुलाला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी मुलगा दारू पिऊन आईला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे पाहून झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाल्याचे वडिलांनी सांगत खुनाची कबुली दिली.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर शवविच्छेदन अहवालात सनीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत त्याच्या घरात चौकशी केल्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलाच्या खुनाची कबुली दिली. आईला शिवीगाळ आणि मारहाण करताना झालेल्या वादात हा प्रकार घडल्याचे वडिलांनी सांगितले. याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 – मच्छिंद्र चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे

Back to top button