पुण्यात ओबीसींसाठी 47 जागा; ओबीसी व महिला आरक्षणांची पुन्हा सोडत | पुढारी

पुण्यात ओबीसींसाठी 47 जागा; ओबीसी व महिला आरक्षणांची पुन्हा सोडत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्ग आणि महिलांच्या जागांसाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. पुणे महापालिकेच्या 173 सदस्यांपैकी ओबीसींसाठी 47 जागा आरक्षित राहतील. एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गासाठीचे आरक्षण कायम राहणार आहे. त्या जागांव्यतिरिक्त ओबीसी प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागा आरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा नव्याने सोडत काढावी लागणार असल्याचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी बुधवारी सांगितले. नव्याने आरक्षण सोडत निघणार असल्याने निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.

पुणे महापालिकेतील 58 प्रभागांत 173 सदस्य आहेत. त्यापैकी ओबीसी प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के म्हणजे 47 जागा आरक्षित केल्या जातील. ओबीसी महिलांसाठी 24 जागा, ओबीसी खुल्या गटासाठी 23 जागा असतील. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एससी आणि एसटी या वर्गासाठी 25 जागा आरक्षित केल्या आहेत. महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे महापालिकेच्या 173 सदस्यांमध्ये महिलांसाठी 87 जागा आहेत. 58 पैकी एक प्रभाग द्विसदस्यीय आहे.

एससीसाठी आरक्षित असलेल्या 23 प्रभागांमधील एक जागा ही एस.टी. प्रवर्गासाठीही राखीव ठेवण्यात आली आहे. उर्वरित 34 प्रभागांमधील पहिली अर्थात ‘अ’ जागा ही ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे, तर ओबीसी प्रवर्गातील उर्वरित 13 जागांसाठी 23 प्रभागांमध्ये चिठ्ठ्या टाकून ‘ब’ ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केली जाईल. हे करीत असताना महिला आरक्षणामध्येही बदल होणार असल्याने महिला आरक्षणाची सोडतही पुन्हा नव्याने काढावी लागेल, अशी माहिती माने यांनी दिली.

Back to top button