पुणे : आसखेड खुर्दच्या परिसरात दिसला बिबट्या | पुढारी

पुणे : आसखेड खुर्दच्या परिसरात दिसला बिबट्या

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आसखेड खुर्द गावच्या परिसरात दोन दिवसांपासून रस्त्यावर बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी सरपंच प्राचीताई लिंभोरे पाटील यांनी केली आहे.

गावच्या परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर हा बिबट्या काळूराम गुंजाळ यांना दिसला आहे. बिबट्या दिसल्याचे त्यांनी इतरांना सांगितले व अनेकांनादेखील बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याने जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याकडून माणसांवर हल्ल्याची घटना घडू नये, म्हणून येथील परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी होत आहे.

मागील तीन-चार वर्षांपूर्वी आसखेड बुद्रुक गावच्या परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून जाणार्‍यावर हल्ला केला होता. कोरेगाव बुद्रुक व कुरकुंडी परिसरातील रस्त्याने जाणार्‍या नागरिकांना बिबट्याने दोन वर्षांपूर्वी पहाटे दर्शन दिले होते.
गावातील काही नागरिकांना बिबट्या दिसल्याने वन विभागाला त्याबाबत कळविले असून, पिंजरा लावण्याची मागणी सरपंच लिंभोरे पाटील यांनी केली.

चाकण वन विभागाचे अधिकार्‍यांनी आसखेड खुर्द गावच्या परिसरात गस्त घालून बिबट्याचा शोध घेण्याच्या सूचना या भागातील वनरक्षक, वनपाल यांना केल्या आहेत. मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला जाईल, असे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button