पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली ! पवना धरण 70 टक्के भरले | पुढारी

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली ! पवना धरण 70 टक्के भरले

येळसे : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुका व पिंपरी- चिंचवड शहराची तहान भागविणारे व मावळातील शेती फुलविणारे प्रमुख असलेले पवना धरण 69.11 टक्के भरले आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. पवना धरण परिसरात मंगळवार (दि.19) दिवसभरात 23 मिलीमीटर पाऊस झाला असून 1 जून पासून धरण परिसरात 1450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तर मागील वर्षी आजच्या तारखेला 37.85 टक्के इतका पाणी साठा होता. 1 जून पासून धरण परिसरात 738 मिमी पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनने या वर्षी जवजवळ 712 मिमी पाऊस जास्त झाला असून धरण 33 टक्के जास्त भरले आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा जेमतेम 17 टक्क्यांवर आला होता.

जुलै महिन्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. अवघ्या पंधरा दिवसात धरणात 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. पाऊस लांबणीवर गेल्यामुळे परिसरात भात लावणी रखडली होती. मुसळधार
पावसामुळे तीही पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यात पाऊसाचा पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी डोंगर भागातून वाहणारे धबधबे, नैसर्गिक जलस्त्रोत खळाळते झाल्याने दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पवना धरण 70 टक्के भरल्याने पिण्याची पाण्याची चिंता मिटल्यामुळे नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button