पिंपरी : पालिका पदाधिकार्‍यांना मिळणार 20 हजारांचा मोबाईल | पुढारी

पिंपरी : पालिका पदाधिकार्‍यांना मिळणार 20 हजारांचा मोबाईल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकार्‍यांना 20 हजार किमतीचा मोबाईल मोफत पुरविला जाणार आहे. मात्र, त्यासाठी पदाधिकार्‍यांना प्रथम मोबाईल खरेदी करून त्यांची जीएसटीसह असलेली पावती जमा करावी लागणार आहे.

त्यानंतर 20 हजारांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर, अधिकार्‍यांना मोबाईल दिले जाणार नाहीत. या नवीन धोरणास आयुक्त तथा राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.19) मंजुरी दिली.

पालिकेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांना कार्यालयीन कामकाजासाठी मोबाईल संचाचे मोफत वाटप केले जात होते. पालिकेच्या विद्युत विभागाचे सन 2007 चे धोरण आहे. मोबाईलची खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जात होती. या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.

मोबाईल संच अधिकार्‍यांना दिले जाणार नाहीत. त्यामुळे अधिकार्‍यांसाठी यापुढे मोबाईलची खरेदी केली जाणार नाही. मात्र, पदाधिकार्‍यांना मोबाईल देण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे.

Back to top button