पुणे : आयटीआय प्रवेश प्रक्रिया खोळंबली | पुढारी

पुणे : आयटीआय प्रवेश प्रक्रिया खोळंबली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला नाही. त्याचा परिणाम अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबरच आयटीआय प्रवेश प्रक्रियेवरदेखील झाला आहे. तीन लाखांहून अधिक नोंदणी होऊनही आयटीआय प्रवेशासाठीच्या नोंदणीला 23 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे आयटीआय प्रवेश प्रक्रिया खोळंबली असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 17 जूनपासून सुरू झाली आहे. आत्तापर्यंत 3 लाख 14 हजार 532 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

त्यातील 2 लाख 92 हजार 758 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. तर 2 लाख 88 हजार 835 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत. यातील 2 लाख 13 हजार 794 विद्यार्थ्यांचे अर्ज आयटीआयकडून कन्फर्म करण्यात आले आहेत, तर 2 लाख 426 विद्यार्थ्यांनी कोणता ट्रेड निवडायचा, याचा पर्यायदेखील निवडला आहे.

यंदा शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून 1 लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरण्यास 17 जूनपासून सुरुवात झाली. त्याला तब्बल एक महिन्याचा कालावधी झाला आहे. जागांपेक्षा जवळपास दुप्पट अर्ज येऊनही पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

Back to top button