वेल्हे : पानशेत खोर्‍यात अतिवृष्टीने 14 जनावरांचा मृत्यू; पशुवैद्यकीय पथक दाखल | पुढारी

वेल्हे : पानशेत खोर्‍यात अतिवृष्टीने 14 जनावरांचा मृत्यू; पशुवैद्यकीय पथक दाखल

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: धरणमाथ्याखाली पावसाचा जोर ओसरला असला, तरी रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत धरणखोर्‍यातील अतिदुर्गम खाणू, चांदर, टेकपोळे, घोल, गारजाईवाडी भागात अतिवृष्टीचे थैमान सुरू आहे. उंच डोंगरकड्यातील खाणू येथील डिगेवस्ती येथे अतिवृष्टीने गाय, बैल, म्हैस अशा 14 जनावरांचा बळी घेतला आहे. वेल्हे तालुका पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ यांच्यासह पशुवैद्यकीय पथकाने रविवारी (दि. 17) मुसळधार पावसात 14 किलोमीटर अंतराची पायपीट करीत घटनास्थळी धाव घेतली. अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या जनावरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दुर्गम भागात संपर्क होत नसल्याने तेथील नुकसानाची माहिती मिळत नाही. त्यामुळे वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दुर्गम वाड्या, खेड्यांत जाऊन माहिती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. दोन आठवड्यांपासून रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टी सुरू आहे. गोठ्यात चारा नसल्याने रानात जनावरे चरण्यासाठी सोडली जात आहेत. तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे ओढ्या-नाल्यांना पूर आले होते. रात्रंदिवस धो-धो पाऊस कोसळत होता. रानात सोडलेली जनावरे रात्री उशिरापर्यंत घरी आली नाहीत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी शेतकरी रानात गेले.

त्या वेळी दहा गायी, तीन बैल व एक म्हैस, अशी 14 जनावरे मृतावस्थेत ठिकठिकाणी झाडझुडपे तसेच ओढ्यात पडलेली दिसली. याबाबत टेकपोळेचे सरपंच संतोष कोकरे यांनी तालुका तहसीलदार तसेच संबंधित विभागाला माहिती दिली. जोरदार थंड वादळी वार्‍यासह धो-धो पाऊस पडत असल्याने जनावरांचा मृत्यू झाला असावा, असे स्थानिक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. वेल्हे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कनुंजे म्हणाले की, घटनास्थळी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले जात आहे. पशू वैद्यकीय पथक जनावरांची तपासणी करून औषधोपचार करणार आहे. शवविच्छेदनानंतर जनावरांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे किती जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, याची माहिती घेतली जात आहे.

Back to top button