पावसामुळे मोरवाडी चौकात पाणीच पाणी | पुढारी

पावसामुळे मोरवाडी चौकात पाणीच पाणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नेहरूनगर येथील संतोषीमाता चौक आणि मोरवाडी चौकात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. गेल्या आठवड्यापासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिंपरी परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्याला जलाशयाचे स्वरूप आल्याने सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.

नेहरूनगर येथील संतोषीमाता चौकात सर्वत्र पाणी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सकाळी दूध विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांपर्यंत सर्वांची धांदल उडाली. रस्त्यावर असलेली छोटी-मोठी दुकाने, टपरीधारक, हातगाडी चालक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

नेहरूनगर, चौपाटी, खराळवाडी, वल्लभनगर या भागातील काही प्रमाणात दुकाने व व्यवहार बंद असल्याचे दिसून आले. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पावसाचा परिणाम परिसरातील वाहतुकीवरही दिसून आला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

पिंपरी शहरातील नदीकाठच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणार्‍या नागरिकांना जवळच्या नातेवाईकांकडे राहण्यास जावे लागले. काही नागरिकांनी राहण्याची व्यवस्था शाळेत करण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागली.

Back to top button