लोणी-धामणी : टोमॅटो बांधणीच्या कामास वेग | पुढारी

लोणी-धामणी : टोमॅटो बांधणीच्या कामास वेग

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, ढोबळेवाडी, बढेकरमळा, पोंदेवाडी, लाखणगाव, वाळुंजनगर, द्रोणागिरी-जाधवमळा (धामणी), देवगाव परिसरात टोमॅटो बांधणीच्या कामास वेग आला आहे. रिपरिप पाऊस चालू असला तरी टोमॅटो बांधणीचे काम सुरू आहे. टोमॅटो लागवडीनंतर ते साधारण दीड ते दोन महिन्यांत तोडायला येतात. साधारण दोन – अडीच महिने तोडणी चालते.

मात्र, टोमॅटो लागवडीपासून ते शेवटचा तोडा होईपर्यंत मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात लागतो, असे सुरेश, संजय व भगवान बढेकर यांनी सांगितले. टोमॅटो लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर केला जात असल्यामुळे खुरपणी जास्त वेळ करावी लागत नाही, त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो. शिवाय टोमॅटोला पाणी देण्यासाठी ड्रीपचा वापर होत असल्याने या दोन्ही ठिकाणी मजूर टंचाईचा सामना करावा लागत नाही.

टोमॅटो बांधणीसाठी एका मजुराला तीनशे रुपये रोज द्यावा लागत आहेत. तसेच ज्या शेतकर्‍यांनी लवकर टोमॅटो लागवड केली आहे. अशा शेतकर्‍यांची टोमॅटो तोडणीला आली आहेत. सध्या टोमॅटोला एका कॅरटला 400 ते 600 रुपये बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.

Back to top button