पुणे : गुंतवणुकीच्या नावाखाली 4 कोटींचा गंडा | पुढारी

पुणे : गुंतवणुकीच्या नावाखाली 4 कोटींचा गंडा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा 5 टक्के दराने परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून 37 गुंतवणुकदारांना तब्बल 4 कोटी 10 लाख 83 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्वांना कंपनीत 135 दिवसांसाठी पैसे गुंतविल्यास दुप्पट रक्कम मिळेल, असेही सांगण्यात आले होते याप्रकरणी नितीन वसंत अनासपुरे (वय 51, रा. सदाशिव पेठ) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव भागवत (वय 58, रा. शारदा हेरिटेज, सावित्रीनगर, हिंगणे खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील आकांक्षा क्रिएशन्स येथे मे 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव भागवत याने सिंहगड रोडवर कार्यालय सुरू केले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा 5 टक्के दराने परतावा मिळेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या रकमेवर मिळणार्‍या नफ्यामध्ये 60 टक्के गुंतवणुकदार याची आणि 40 टक्के त्यांची भागीदारी असे प्रलोभन दाखविले. एवढेच नाही, तर शैलजा कमर्शिअलमध्ये 135 दिवसांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर दुप्पट रक्कम मिळेल, अशा योजना सांगून लोकांना आपल्या जाळ्यात खेचून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादी नितीन अनासपुरे यांनी त्यांची आई, सासरे यांच्या नावाने 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्यासह आणखी 37 जणांनी अशाच प्रकारे 4 कोटी 10 लाख 83 हजार 725 रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना आजपर्यंत कोणतीही रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. पैशांसाठी पाठपुरावा केल्यानंतरदेखील ना गुंतवणूक केलेली रक्कम मिळत आहे ना नफा हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज केला होता. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैरागकर करीत आहेत.

Back to top button