पिंपरी रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग अखेर मोकळा | पुढारी

पिंपरी रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग अखेर मोकळा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबत महापालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागाच्या वतीने 58,57,30,577 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच पुलाचे काम सुरू होणार आहे.

मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल जागेचे डिमार्केशन व इतर कामे तत्काळ मार्गी लावण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने तत्कालीन मनपाचे अधिकारी शेटे, रत्नाकर जगताप यांच्याकडे 1 फेब्रुवारी 2019 रोजी पाहणी करताना करण्यात आली होती. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी ‘ट्रायल पीट’ घेण्याचे काम सुरू झाले.

केवळ 14 दिवसांत रेल्वे लाईनच्या बाजूला ‘ट्रायल पीट’ घेण्याचे काम पूर्ण झाले होते. यानंतर उड्डाणपुलाचे काम 8081 चौरस मीटर क्षेत्रावर सुरू करण्याबाबतची परवानगी 17 ऑगस्ट 2020 रोजी मिलिटरी डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन्ट कर्नल ग्यान प्रकाश यांनी महापालिकेला दिली.

त्यानुसार महापालिकेच्या वतीने उर्वरित एकूण 23842 स्क्वेअर मीटर (5.98 एकर) जागा ताब्यात घेण्यासाठी 20 कोटी 98 लाख रुपये जुलैमध्ये भरण्यात आले. त्यानुसार रेल्वे उड्डाणपुलासाठी लागणारे संपूर्ण क्षेत्र ताब्यात आल्यानंतर स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक वाघेरे यांनी तत्कालीन रक्षामंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स,डिफेन्स इस्टेट ऑफिस याठिकाणी देखील पाठपुरावा करण्यात आला होता. या रेल्वे उड्डाणपुलासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्थापत्य प्रकल्प विभागाचे श्रीकांत सवणे आणि बापू गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Back to top button