औंध, बाणेर, पाषाणमधील रस्त्यांवर पाणीच पाणी | पुढारी

औंध, बाणेर, पाषाणमधील रस्त्यांवर पाणीच पाणी

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: औंध, बाणेर, पाषाण परिसरामध्ये अनेक रस्त्यांवर पावसाळी वाहिनीच्या अभावामुळे जवळपास सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी वाहत असताना पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावर येणारे पावसाचे पाणी थांबवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे. स्मार्ट सिटी म्हणवणार्‍या या परिसरामध्ये मात्र स्मार्ट काम करण्यामध्ये प्रशासनाचा स्मार्टनेस दिसून येत नाही. बाणेर पाषाण लिंक रोड, अलोमा कांउटी औंध बाणेर रोड, ताम्हाणे चौक, सायकर मळा, बाणेर स्मशानभूमी रोड, सुप्रिया संकुल बाणेर आदी ठिकाणी पावसाळी वाहिन्यांचा अभाव दिसून येतो.

या समस्येबाबत बोलताना सायकर मळा येथील रहिवासी किशन शिंदे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सायकर मळा येथील रस्ता अपूर्ण आहे. तसेच मुख्य रस्त्याला व आमच्या घरासमोरही पावसाळी लाईन नसल्याने घरात पाणी दरवर्षी शिरते. वारंवार प्रशासकीय अधिकारी व स्थानिक प्रतिनिधींना समस्या मांडूनही समस्या सुटत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Back to top button