पिंपरी : शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख पुढे ढकलली | पुढारी

पिंपरी : शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख पुढे ढकलली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात येत्या 20 तारखेला नियोजित असलेली शिष्यवृत्ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 31 तारखेला होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी हित व त्याची सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 11 हजार 373 विद्यार्थी बसणार आहेत. 80 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने महापालिका शिक्षण विभागाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे मुख्य कार्यालय हे चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर हे आहे. पाचवीच्या परीक्षेसाठी 7094 तर, आठवीच्या परीक्षेला 4279 विद्यार्थी बसणार आहेत. पाचवीसाठी 49 परीक्षा केंद्र तर, आठवीसाठी 31 परीक्षा केंद्र असणार आहे. या परीक्षा केंद्रांसाठी 80 केंद्र संचालक, 578 पर्यवेक्षक, 155 शिपाई यांची नियुक्ती केली आहे.

Back to top button