पुणे : शिंग्रोबाचा माळ ते राशीन रोड रस्त्याला मुहूर्त मिळेना | पुढारी

पुणे : शिंग्रोबाचा माळ ते राशीन रोड रस्त्याला मुहूर्त मिळेना

भिगवण, पुढारी वृत्तसेवा : गेल्या कित्येक वर्षांत दौंड व इंदापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींसमोर गार्‍हाणे मांडले, त्यांच्यासमोर दयायाचना केली. मात्र, तरीही शिंग्रोबाचा माळ ते राशीन रोडपर्यंत दोन किमीचा रस्ता तयार होत नाही. परिणामी, वाड्या-वस्त्यांवरील पाचशेहून अधिक महिला-पुरुष व लहान-मोठ्या विद्यार्थ्यांना चिखलामुळे घराबाहेर पडणे अवघड बनले आहे.

आदिवासी भागातील स्थिती सधन भागही अनुभवत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. भिगवण (ता. इंदापूर) व राजेगाव (ता. दौंड) या दोन गावांच्या व तालुक्यांच्या मध्यभागी शिंग्रोबाचा माळ ही वस्ती आहे. येथे शेतीनिमित्त आसपास वस्ती करून राहणारे नागरिक असून, या वस्तीवरील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यातही पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय व निसरडा होत असल्याने येथील नागरिकांना वस्तीबाहेर पडण्यास मोठी कसरत करावी लागते. लहान मुलांना तर शाळेला दांडी मारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.

यावरून येथील नागरिकांनी दौंड व इंदापूरच्या दोन्ही आजी-माजी लोकप्रतिनिधींकडे रस्त्याचे गार्‍हाणे मांडले. तेव्हा कुठे शिंग्रोबाचा माळ ते राशीन रोडपर्यंत रस्ता मंजूर झाला. मात्र, बाबरवस्तीपर्यंत जो थोडा रस्ता केला आहे, तोही अरुंद केला आणि पुढे काम ठप्प झाले. त्यामुळे पाऊस सुरू होताच सध्या या भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी घराबाहेर पडणे अवघड बनले आहे.

रस्त्याची लांबी जास्त नसली, तरी हा रस्ता पुढे भिगवण, डिकसळ, खानवटे, राजेगावकडे जोडला जातो. परंतु, पावसाळ्यात हा रस्ता ठप्प होतो. याबाबतची कैफियत येथील नागरिक बबन मोहिते, संपत चव्हाण, बाळा मोहिते, प्रमोद जाधव, भागवत जाधव, अमोल आटोळे, संजय बाबर आदींनी मांडली असून, शिंग्रोबाचा माळ ते राशीन रोड तातडीने तयार करावा. यामध्ये पाणंद रस्ता 33 फुटांचा असल्याने रस्त्याची रुंदी जास्त ठेवून रस्ता तयार करून मिळावा, अशी मागणी केली आहे.

Back to top button