पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांत केले वृक्षारोपण | पुढारी

पुणे : रस्त्यावरील खड्ड्यांत केले वृक्षारोपण

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा : माळेगाव ग्रामपंचायतीच्या अमरसिंह कॉलनीतील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार सांगूनही रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करून स्थानिक प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या अमरसिंह कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, बहुतांश ठिकाणी खडीकरणही नष्ट झाले आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे रस्त्यांचे काम करण्याची वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्यापही काम झालेले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य व पाण्याची डबकी साचली आहेत. परिणामी, रस्त्यावरून चालताना व प्रवास करताना नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. छोटी-मोठी वाहने घसरून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.

अखेर या भागातील वैतागलेले नागरिक कैलास नंदू संकट, राजू गायकवाड, शैला चव्हाण, वर्षा खिलारे, उमा कुंदेकर, मयूरी दुरगडे, मीना कुचेकर आदींनी प्रशासनाला जाग यावी, यासाठी रविवारी (दि. 10) गांधीगिरी मार्गाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत
आंदोलन केले.

Back to top button