पिंपरी : कोरोनोने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची परवड; आठ महिने उलटूनही आर्थिक मदत नाही | पुढारी

पिंपरी : कोरोनोने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची परवड; आठ महिने उलटूनही आर्थिक मदत नाही

राहुल हातोले

पिंपरी : पत्नी आणि दोन मुले पाठीशी ठेवून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सापडल्याने घराचा आधार गेला. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी सगळीकडे कोरोेनाच्या आजाराचे दाट धुके असतानाही मिळेल ती कामे करीत होता. अशातच सहकार्‍यांना लागण झाल्याने यालाही कोव्हिडची बाधा झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिसर्‍याच दिवशी प्राणज्योत मालवली. यानंतर दोन लहान मुलांचा सांभाळ, शिक्षण आणि इतर खर्च कसा भागविणार? असा प्रश्न तिला पडला, तिने एमआयडीसीत कामही सुरू केले.

या आहेत प्रातिनिधीक स्वरूपातील दोन घटना. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांचा आकडाही मोठा आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तिंच्या नातेवाइकांसाठी पन्नास हजार रूपयांची मदत जाहीर केली होती. यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यानुसार नागरिकांनी अर्ज देखील भरले आहेत. काही दिवसानंतर कोव्हिड रिलिफ फंडाच्या वेबसाईटवरील त्यांच्या प्रोफाईलवर अर्ज मंजूर झाल्याचे स्टेटसही दिसत आहे. मात्र आठ महिने उलटून गेले अद्यापही शासनाची मदत नातेवाईकांना मिळालेली नाही.

अर्जातील त्रुटी
आधारकार्ड बँकेला लिंक नसल्याने बरेच अर्ज प्रलंबित आहेत.
काही नागरिकांचे बँक अकाउंट नंबर चुकले आहेत.
योग्य कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित.

नातेवाइकांना हेलपाटे
अर्जदारांच्या बँक अकाउंटच्या समोर शून्य असेल तर त्या अकाउंटला पैसे जमा करण्यात आले नाहीत. एक्सलशीटमध्ये शून्य ग्राह्य धरला जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन पुन्हा अकाउंटची माहिती सादर करावी लागत आहे.शासनाकडे निधी नसल्याने अर्ज मंजूर करून देखील आठ महिन्यांपासून अर्ज प्रलंबित आहेत.

7616
पिंपरी-चिंचवडमधून सादर अर्ज
7603
त्रुटी दुरुस्त करून पुन्हा सादर अर्ज
5553
मान्यता मिळालेले अर्ज
715
अर्ज मंजूर होऊन, वाटप झालेली मदत

यातच शासनाने गेल्या वर्षी कोव्हिडमुळे मरण पावलेल्या मयताच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत देऊ केली. म्हणून ऑनलाइनद्वारे आठ महिन्यांपूर्वी अर्ज भरला. मात्र, अद्यापदेखील मदत मिळाली नाही.

                                                                              – अ.ब.क. आकुर्डी.

आम्हा दोघींपैकी मी मोठी असल्याने माझे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले. तर, शिक्षणामुळे विलंब झाल्याने दुसरीच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू होते. मात्र कोरोनाचा प्रलय झाला आणि आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाली. रूग्णालयातील बिभत्स आणि घाबरविणार्‍या वातावरणात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु असह्य वेदनांमुळे दोघांनाही एकाच दिवशी मरण आल. आपल्या पोरींना जिवापाड जपणारे आई-वडील एकाचवेळी आपल्यातून निघून गेले. हा धक्का सहन न झाल्याने लहान बहिणीची मानसिकता बिघडली. तिचा उपचार आणि इतर खर्च भागविण्यासाठी पैशाची गरज भासते. कितीही पैसे देऊ केले तरी गेलेली व्यक्ती परत मिळत नाही, मात्र शासनाने मंजूर केलेली रक्कम मिळाली तर आर्थिक ताण कमी होईल.
– अ.ब.क. चिंचवड.

त्रुटी असलेल्या अर्जांची दखल घेत नागरिकांना योग्य सूचना व मार्गदर्शन देऊन त्यांचे सुधारित अर्ज आम्ही पाठवून देत आहोत. अद्यापही कुणाचे अर्ज सादर झाले नसतील अथवा त्रुटीं असतील तर त्यांनी विभागाशी संपर्क साधावा.

                              – लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी,
                                                     पिं. चि. महापालिका.

Back to top button