पिंपरी : कमळाची चटणी, पानांची भाजी अन् बियांची खीर! | पुढारी

पिंपरी : कमळाची चटणी, पानांची भाजी अन् बियांची खीर!

वर्षा कांबळे: पिंपरी : कमळाच्या पानांची भजी, फुलाची चटणी, पराठे अन् बियांची खीर… वाचून आश्चर्य वाटले ना? पिंपरीत एका अवलियाने फुलविलेल्या कमळाच्या शेतीत पर्यटकांना हा मेनू मिळत आहे. कमळाचे फूल, पान, देठ आणि तंतूंपासून होणारे फायदे पटवून देत ते तरुणांना ही शेती करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत.

डुडुळगाव येथील सतीश गादिया हे गेल्या 18 वर्षांपासून कमळाची शेती करीत आहेत. तेथे राज्यभरातूनच नाही तर इंग्लंड, अमेरिका, बँकॉक, न्यूझीलंड आदी देशांतून मिळविलेल्या कुमुदिनी आहेत. गादिया यांच्या आजींना देवपूजेसाठी फुलं लागायची. नदीकाठच्या परिसरातून गदिया तिला पूजेसाठी कमळफुलं आणून द्यायचे. त्यातूनच त्यांना कमळफुलं आवडायला लागली. पुढे मोठेपणी त्यांचे हे कमळवेड पाहून त्यांचे सासरे सुभाष रुणवाल यांनी आळंदीजवळील डुडूळगावात एक एकर जमीन दिली.

तोपर्यंत गादियांकडे तीन ते चार प्रकारची कमळ रोपे होती. मग कमळ रोपांच्या शोधात गादियांनी आजपर्यंत ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, पं. बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, आदी राज्यं पालथी घातली. कमळ बागेचं खास आकर्षण म्हणजे 108 पाकळ्यांचं असणारं सर्वात मोठं कमळ. हे कमळ त्यांनी केरळमधून मिळवलं. मखना या जातीची वाँटरलीली नावाची जात ही त्यातलीच. लीली प्रकारातली. तिची पाने पाच ते दहा फूट गोलाकार व्यासाची असतात. व्हिक्टोरिया जातीच्या कमळाची पानंसुद्धा पाच ते दहा फुटांपर्यंत मोठी आहेत. कमळाचे 108 प्रकार गादियांच्या बागेत आहेत.

मगर मागे लागली!
कमळरोपांच्या शोधात गदियांनी ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, पं. बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, आदी राज्ये पालथी घातली. एकदा ओरिसातल्या तळ्यात कमळांचे कंद मिळवत असताना मगर त्यांच्या पाठीमागे लागली. बिहारमध्ये कमळकंद मिळविताना कमळाच्या तळ्यातच ते रुतले. त्या वेळी मित्रांच्या मदतीने त्यांना त्या तळ्याबाहेर काढावं लागलं.

कमळाचे अर्थकारण
नारळाच्या झाडाला जसे कल्पवृक्ष म्हटले जाते तसेच कमळाला देखील कल्पवेल म्हणावे लागेल असे गादिया सांगतात. कुमुदिनीच्या बियांपासून लाडू बनविले जातात. कमळाच्या फुलांचा ज्यूस, कमळ फुलाचे सरबत, कमळांचे कमळकंद, कमळ चटणी, कमळ पावडर, कमळांच्या बियांपासून बनविली जाणारी खीर येथे मिळते. कमळबियांचा अनेक भाज्यांमधून उपयोग केला जातो. कमळदेठांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. कमळदेठाची भाजी, भजी, कबाब, लोणचे केले जाते.

कमळाच्या पानांची चविष्ट भजीही ते बनवितात. कमळाच्या पानांपासून पत्रावळीही केल्या जातात.कमळ कंदसुद्धा बनविला जातो. कापडासाठी कमळाच्या तंतूला मणिपूरमधून मागणी आहे. किडनीचे विकार, मूत्रसंसर्ग, गॅस, अस्थमा या विकारांवर कामनयनी हे कमळ उपयुक्त आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, रक्तदाबाच्या समस्यांवर ते उपयोगी आहे. मधुमेहाच्या विकारावर पांढरे कमळ उपयोगात येते. कमळकेशर हे थंड प्रकृतीच्या त्वचेला तजेला देण्यासाठी वापरले जाते, असे ते सांगतात.

माझे कमळाचे प्रेम पाहून सुरुवातीला लोक मला वेडे म्हणत असत. मात्र, नंतर कमळाची शेती पाहून कौतूक होऊ लागले. माझ्या शेतातील कमळांची फुले ही माझी मुले आहेत.

Back to top button