एचसीएल कंपनीत ‘कमवा शिका’ | पुढारी

एचसीएल कंपनीत ‘कमवा शिका’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत एचसीएल कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी कंपनीच्या लिंकवर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण आणि एचसीएल यांच्या वतीने महाराष्ट्र यंग लीडर्स अ‍ॅस्पिरेशन डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविला जात आहे. त्याच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान अभियंता होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र यंग लीडर्स अ‍ॅस्पिरेशन डेव्हलपमेंट कार्यक्रमासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना थेट आयटी व्यावसायिक बनण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी 7 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त होतकरू विद्यार्थी घेऊ शकतील. त्यामुळे यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात यावी, अशी सूचना विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

प्रत्यक्ष प्रकल्पावर काम करण्याची संधी
एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीमार्फत आयटीचे शिक्षण, प्रशिक्षण आदी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी गणित विषयात 60 गुणांसह बारावी विज्ञान शाखेत 60 टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची अट ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा महिन्यांनंतर त्यांना प्रत्यक्ष प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार आहे. निवड होणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा मानधन आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीचे शिक्षण व पदवी मिळणार आहे.

Back to top button