पुणे विद्यापीठात आजपासून बेमुदत घंटानाद आंदोलन | पुढारी

पुणे विद्यापीठात आजपासून बेमुदत घंटानाद आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात अनावश्यक शुल्कवाढ झाली, या विरोधात आजपासून (दि. 11) विद्यापीठात संघटना घंटानाद आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी वारंवार प्रशासनाला निवेदने दिली. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, म्हणून विद्यापीठातील विद्यार्थी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीसंदर्भात विविध संघटना व विद्यार्थी यांनी निवेदने दिल्यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. शेवटी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिल्यावर एक समिती विद्यापीठाने गठित करण्याचे सांगण्यात आले.

मात्र, या समितीकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक निर्णय घेण्यात आले नाहीत. विद्यापीठातील या संपूर्ण अजब कारभाराचा थेट विद्यार्थ्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ मुख्य इमारत आवारात सोमवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत संविधानिक मार्गाने बेमुदत घंटानाद आंदोलन विद्यार्थी करणार आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. सर्व विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना आदींनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.

Back to top button