पिंपरी : विद्यार्थ्यांना सेतूचा ‘बूस्टर डोस’ | पुढारी

पिंपरी : विद्यार्थ्यांना सेतूचा ‘बूस्टर डोस’

दीपेश सुराणा: 

पिंपरी : कोरोनामुळे जवळपास दोन वर्षे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास केला. महापालिका शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे गरीब घरांतील आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नव्हते. पर्यायाने, 40 ते 50 टक्के विद्यार्थी अभ्यासात मागे पडल्याचे पूर्वचाचणी परीक्षेत आढळले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची उजळणी करून घेण्यासाठी सध्या पुर्नरचित सेतू अभ्यासक्रमाचा ‘बूस्टर डोस’ त्यांना दिला जात आहे.

कोरोनामुळे दोन वर्ष शाळांमधून ऑफलाइन अभ्यास बंद होता. त्यामुळे शाळांनी ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय स्वीकारला होता.
मुलांना घरबसल्या अभ्यास समजण्यात अडचणी आल्या. त्यातही महापालिका शाळांमध्ये शिकणार्‍या सर्वच मुलांकडे मोबाईल उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या पालकांना संपर्क साधून आवश्यक अभ्यास देण्याचे काम शिक्षकांनी केले. तरीही मुले अभ्यासात मागे पडल्याचे चित्र पूर्वचाचणी परीक्षेच्या निष्कर्षावरून पुढे आले आहे. भाषा, गणित या विषयांमध्ये किमान कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली नसल्याचे आढळले आहे.

30 दिवसांचा अभ्यासक्रम
दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार केला आहे. हा अभ्यास इयत्तानिहाय आणि विषयनिहाय तयार केला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वांच्या क्षमतांवर आधारित हा अभ्यासआहे. विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, अक्षर ओळख, शब्द ओळख, चित्र परिचय आदींची माहिती करून देणे, त्याबाबत त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करणे या उद्देशाने 30 दिवसांचा अभ्यासक्रम सध्या महापालिका शाळांमध्ये राबविला जात आहे. 20 जून ते 23 जुलै (शालेय कामकाजाचे दिवस) असा सेतू अभ्यासक्रमासाठी कालावधी दिलेला आहे. 25 आणि 26 जुलैला या अभ्यासक्रमावर आधारित उत्तरचाचणी घेतली जाणार आहे.

महापालिका शाळांमधून सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी घेतलेल्या पूर्वचाचणी परीक्षेत 40 ते 50 टक्के मुले अभ्यासात मागे पडल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची उजळणी करून घेण्यासाठी सेतू अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहे.
– रजिया खान, सहाय्यक प्रशासन अधिकारी,
महापालिका शिक्षण विभाग.

Back to top button