मुसळधार पावसात सिंहगड हाउसफुल्ल | पुढारी

मुसळधार पावसात सिंहगड हाउसफुल्ल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: पावसात सिंहगडावर शनिवारी (दि. 9) हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. गडाच्या घाट रस्त्यावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. घाट रस्ता, तटबंदी, बुरुजाच्या दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वनविभागाच्या सुरक्षारक्षकांना धावपळ करावी लागली. घाट रस्त्यात तसेच बुरुजाच्या तटबंदीवर उभे राहून फोटो काढणार्‍या तसेच हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे आदींसह सुरक्षारक्षकांना कसरत करावी लागली. दरम्यान, पावसाच्या दाट धुक्यात किल्ला हरवून गेला होता. पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटताना तरुणाईने जल्लोष केला.

सिंहगडावर जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांकडून दिवसभरात तब्बल सव्वा लाख रुपयांचा टोल वनखात्याने वसूल केला. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांनी गर्दी केली होती. घाट रस्ता सकाळपासून वारंवार बंद करण्यात आला तरीही पर्यटकांची गर्दी ओसरली नाही. शेकडो जण चालत गेले. वनरक्षक जिवडे म्हणाले, सिंहगडावर पर्यटकांची दिवसभरात 1300 दुचाकी व 475 चारचाकी वाहने गेली. हजारो पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. चार दिवसांपूर्वी घाट रस्त्यावर दरडीचा भाग कोसळला होता. आज कोठेही दरड कोसळली नाही. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घाट रस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Back to top button