महा-ई-सेवा केंद्रे पूर्ववत होण्यास आठवडा; दहा दिवसांपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड | पुढारी

महा-ई-सेवा केंद्रे पूर्ववत होण्यास आठवडा; दहा दिवसांपासून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महाआयटी सर्व्हरमध्ये अतिरिक्त डाटा साठविण्यात आल्याने गेल्या दहा-अकरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. हा बिघाड अद्यापही दूर होऊ शकलेला नाही. मुख्य सर्व्हरवरून उपसर्व्हरवर अद्यापही लाखो कागदपत्रे स्थलांतरित करायची बाकी असल्याने पुढील आठवड्यातच पुण्यासह उर्वरित राज्यातील महा-ई-सेवा केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकणार आहेत. राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले – प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात.

गेल्या काही दिवसांपासून महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रांवरील कामकाज तांत्रिक कारणास्तव रखडले आहे. त्यामुळे इतर कामकाजासाठी देखील या केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून येत असून अनेक केंद्र बिघाड असल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीच्या प्रमाणपत्रापासून रहिवासी दाखल्यापर्यंतची सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

मात्र, महा-ई-सेवा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे महाविद्यालयीन प्रवेशदेखील रखडल्याने विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. बहुतांश ठिकाणी इतर आर्थिक, वैद्यकीय कारणास्तव लागणारे उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक नागरिकांची कामे रखडल्याचे चित्र सध्या आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांकडून आवश्यकतेनुसार मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे.

नेमकी समस्या काय ?
महा-ई-सेवा केंद्रातील सर्व्हरमधील डाटा पर्यायी सर्व्हरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. 43 लाख जुने दाखले दुसर्‍या सर्व्हरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. सध्या 12 लाख दाखले स्थलांतर करण्याचे बाकी आहेत. तासाला अंदाजे एक लाख दाखले किंवा प्रमाणपत्र सर्व्हरमध्ये हलविण्यात येतात.

महा-ई-सेवा तसेच सेतू केंद्रांसाठी महाआयटीअंतर्गत एकच क्लाऊड सर्व्हर आहे. या क्लाऊड सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात डाटा संचयित झाला आहे. परिणामी क्लाऊडमध्ये जागा (स्पेस) उपलब्ध नसल्याने जुना संचयित डाटा काढण्यात आला आहे. तसेच किरकोळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे.

                                              – राहुल सुर्वे, राज्य व्यवस्थापक, महाआयटी

Back to top button