‘प्राध्यापकांसाठीचे ते परिपत्रक ही संचारबंदी’ | पुढारी

‘प्राध्यापकांसाठीचे ते परिपत्रक ही संचारबंदी’

पुणे : पुढारी वृत्तसेवा: उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयात प्राध्यापकांच्या उपस्थितीतीला अटकाव करणारे परिपत्रक उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी काढले आहे. पंरतु या परीपत्रकाचा विविध प्राध्यापक संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. हे परिपत्रक म्हणजे प्राध्यापकांवरील संचारबंदी असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

‘प्राध्यापकांची कामे प्रलंबित राहतात. प्राध्यापक रजा टाकून शेकडो किलोमीटरवर कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी जातात. संचालक कार्यालयाने प्रत्येक प्रकरणासाठी कालमर्यादा निश्चित करावी. म्हणजे कार्यालयांत गर्दी होणार नाही आणि असे परिपत्रक काढण्याची वेळ येणार नाही,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कान्हू गिरमकर यांनी व्यक्त केले आहे.

प्राध्यापकांची कामे वेळेवर आणि सुरळीत व्हावी यासाठीच हे परिपत्रक काढले आहे. अध्यापनाला पुरेसा वेळ मिळावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे म्हणून हा प्रयत्न आहे. एखाद्या प्राध्यापकाला जावेच लागणार असेल तर त्यांनी प्राचार्यांची परवानगी घेवून जावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी नाराज होण्याची आवश्यकता नसून, त्यांची कामे अधिक जलदगतीने करण्याचाच आमचा प्रयत्न आहे.

                       – डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय

Back to top button