मार्केट यार्ड परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

मार्केट यार्ड परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा: पाणीकपातीला स्थगिती देऊनसुद्धा मार्केट यार्ड विभागात पाणीपुरवठा सुरळीत नाही. धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेने पुणे शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला होता. दमदार पावसाला प्रारंभ झाल्यानंतर व सण असल्याने महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात रद्द केला. दि. 8 पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे जाहीर पत्रकही महापालिकेने प्रसिद्ध केले. परंतु, काही ठिकाणी पाणीपुरवठा अपुर्‍या स्वरूपात केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

मोठमोठ्या सोसायट्या, काही झोपडपट्ट्यांमध्ये भरपूर पाणी मिळत असले, तरी मध्यमवर्गीय सोसायटीत ठरावीक ठिकाणी मात्र पाणी अपुरे सोडले जाते. गेल्या दोन दिवसांपासून पाणी न आल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी सोडणारे कर्मचारी ठरावीक ठिकाणी पाणी जास्त सोडतात, तर ठरावीक ठिकाणी कारणे देऊन पाणी सोडण्याचे टाळतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सनी खरात यांनी केला.

सामाजिक कार्यकर्ते संजय दामोदर म्हणाले की, मार्केट यार्ड परिसरातील पाणी साठवण्याच्या पाण्याची टाकीची पातळी खोलवर गेली आहे, असे सांगून या परिसरात रात्री फक्त अर्धा तास पाणी सोडले. पुन्हा पाणी सोडले नाही. वारंवार फोन करूनही कर्मचारी व अधिकारी या समस्येकडेे लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘गेल्या दोन दिवसांपूर्वी दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय होता. आजपासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल तसेच सर्व ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा केला जाईल.’

Back to top button