‘यूजीसी नेट’साठी प्रवेशपत्र उपलब्ध | पुढारी

‘यूजीसी नेट’साठी प्रवेशपत्र उपलब्ध

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या ‘नेट’ साठी प्रवेशपत्रे (अ‍ॅडमिट कार्ड) उपलब्ध झाली आहेत. येत्या 9 जुलै रोजी परीक्षा देणार्‍या उमेदवारांना ही प्रवेशपत्रे “https://ugcnet.nta.nic.in/’ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. देशातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अ‍ॅण्ड असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र ठरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. यूजीसीच्या वतीने ही ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (यूजीसी नेट) नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात येते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2021ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे या परीक्षांच्या सत्रातील सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर 2021 आणि जून 2022 ची परीक्षा एकत्रितरीत्या घेतली जाणार आहे. त्यानुसार 9, 11 तसेच 12 जुलै त्याचबरोबर 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यातील 9 जुलै रोजी होणार्‍या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर 11 आणि 12 जुलै रोजी होणार्‍या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परीक्षार्थींना लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे. 84 विषयांसाठी होणारी ही परीक्षा देशातील 91 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे.

Back to top button