पुणे : बोकड बाजारात सव्वा कोटीची उलाढाल | पुढारी

पुणे : बोकड बाजारात सव्वा कोटीची उलाढाल

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण (ता. खेड) येथील बोकड बाजारात बुधवारी (दि. 6) मोठी उलाढाल झाली. येथे विक्रीसाठी आलेल्या 2 हजार 200 बोकडांपैकी 1 हजार 500 बोकडांची विक्री झाली. बोकड बाजारातील एकूण उलाढाल 1 कोटी 25 लाख रुपये झाली.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारात मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अधिकचा बोकड बाजार भरला होता. जिल्ह्याच्या विविध भागांतील व्यापार्‍यांनीही बोकड खरेदीसाठी चाकण मार्केटमध्ये गर्दी केली होती. खेड बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे व सहसचिव संतोष गायकवाड यांनी सांगितले की, चाकण मार्केटमध्ये बोकडांची किंमत 35 ते 40 हजारांच्या पुढे आहे. चाकण येथील गुरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असल्याने राज्यभरातून व्यापारी शेळ्या, मेंढ्या, बोकडांची खरेदी-विक्री करण्यासाठी येत आहेत. रविवारी (दि. 10) बकरी ईद सन आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी (दि. 9) देखील गुरांचा मोठा बाजार भरण्याची शक्यता आहे. बुधवारी भरविण्यात आलेल्या अधिकच्या बाजारात दीड हजार बोकडांची विक्री होऊन सव्वा कोटी रुपये उलाढाल झाल्याचे देखील बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दीड लाखाची बोकड जोडी.

दीड लाखाची बोकड जोडी

चाकण मार्केट येथे अन्य राज्यांतून खास धष्टपुष्ट बोकड बुधवारी विक्रीसाठी आणण्यात आले होते. यातील एका व्यापार्‍याकडे दीड लाखाची अत्यंत आकर्षक वजनदार बोकडांची जोडी विक्रीसाठी होती. बुधवारी या बोकडांची विक्री झाली नाही. मात्र, पुढील शनिवारी या बोकडांची विक्री नक्की होईल, असे या व्यापार्‍याने सांगितले.

Back to top button