पिंपरी : पावसामुळे पाणीकपात दूर होण्याची शक्यता | पुढारी

पिंपरी : पावसामुळे पाणीकपात दूर होण्याची शक्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आतापर्यंत एकूण 337 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात हळूहळू साठा वाढत आहे. पावसाची ही समाधानकारक स्थिती कायम राहिल्यास पिंपरी-चिंचवड शहरावरील पाणी कपात टळू शकते. पाऊस लांबल्याने धरणातील पाणी साठा 16 टक्के इतक्या खाली आला होता. ते पाणी महिन्याभर पुरेल इतके होते. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याबाबत दक्षता घेऊन त्याचा काटकरीने वापर करण्याची सूचना पाटंबधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस केली होती.

पालिका दररोज 510 ते 520 एमएलडी पाणी पवना नदीतून उचलून संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाणीसाठा कमी असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणी कपातीमध्ये आणखी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, तसे नियोजन केले आहे. पाऊस समाधानकारक न झाल्यास प्रत्यक्ष कपात लागू करू अन्यथा नाही, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. मागील दोन दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आतापर्यंत एकूण 337 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात मंगळवार (दि.5) पासून पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. संततधार पावसाची स्थिती कायम राहिल्यास साठा वाढण्याची शक्यता आहे, असे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

दोन दिवस पाणी साठ्यात हळूहळू वाढ
पवना धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पाणी साठा हळूहळू वाढत आहे. जोरदार पाऊस कायम राहिल्यास महिन्या दीड महिन्यात धरण भरेल, असा अंदाज पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button