मतदार यादीचे गुगल मॅपिंग अंतिम मतदार यादी 17 जुलैला होणार जाहीर | पुढारी

मतदार यादीचे गुगल मॅपिंग अंतिम मतदार यादी 17 जुलैला होणार जाहीर

पुणे ; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील नावांचा गोंधळ दूर करण्यासाठी विधानसभानिहाय मतदार यादीची बूथनिहाय गुगल मॅपिंग केली जाणार आहे. त्यातून मतदारांची नावे नक्की त्याच परिसरातील आहेत, हे समजू शकणार आहेत. दरम्यान, प्रारूप मतदार यादीवरील हरकतीसाठी आठवड्याची मुदत देण्यात आली असून, 17 जुलैला अंतिम यादी जाहीर होणार आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर जवळपास पावणेपाच हजार हरकती-सूचना आल्या आहेत. प्रामुख्याने मतदारांच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर येत असून, सर्वच राजकीय पक्षांकडून त्यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने हरकती आल्याने महापालिकेने त्यावरील प्रक्रियेसाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने 16 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. दरम्यान, मतदार यादीतील नावांच्या दुरुस्तीसाठी विधानसभानिहाय मतदार याद्याचे बूथनिहाय मॅपिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने विधानसभानिहाय मतदारयाद्यांवरून प्रा-रूप मतदार याद्या तयार केल्या आहेत.

यात कोणतीही नावे समाविष्ट करण्यात अथवा वगळण्यात आलेली नाहीत. मात्र, तरीही मतदार याद्यांवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले आहेत. त्यामुळे आता जिथे आक्षेप नोंदविण्यात आलेले आहेत, त्या याद्यांचे विधानसभा निवडणुकीसाठीच्या बूथनिहाय गुगल मॅपिंग केले जाणार आहे. परिणामी, मतदारांचे नाव योग्य यादी व बूथवर येऊन मतदार यादीबाबतचे आक्षेप दूर होतील, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

Back to top button