वडगावात रस्तारुंदीकरण कामाचा राडारोडा नाल्यात | पुढारी

वडगावात रस्तारुंदीकरण कामाचा राडारोडा नाल्यात

धायरी : पुढारी वृत्तसेवा : वडगाव बुद्रुक येथील पाउंजाई मंदिराजवळील नाल्यात म्हशीच्या गोठ्यामागे मोठ्या प्रमाणावर मातीचा राडारोडा टाकण्यात आला आहे. हा राडारोडा नवले ब्रिज  ते कात्रजपर्यंत होणार्‍या रस्तारुंदीकरण कामाचा आहे. या राडारोड्याने नाल्यातील वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

मागील झालेल्या महाप्रलयात या ओढ्याला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे मोठी जीवितहानी होऊन अनेक घरे व इमारतींची पडझड झाली होती. तशाच प्रकारची संभाव्य धोकादायक परिस्थिती नाल्यात टाकलेल्या राडारोड्यामुळे निर्माण झाली आहे.

हा नाला नर्‍हे, आंबेगाव भागातून वाहत येतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. नाल्याला पूर येण्याची शक्यता असल्याने नाल्यात टाकलेला राडारोडा त्वरित उचलावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कुमार कुत (कन्सल्टंट) म्हणाले, ‘या नाल्यात स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाचा राडारोडा येथे टाकला आहे. हा मातीचा राडारोडा दोन दिवसांत उचलण्यात येईल.’

Back to top button