चासकमान धरणात ७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक | पुढारी

चासकमान धरणात ७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक

कङूस : पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यासह शिरुर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणात ७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पडत असलेल्या पावसाने भीमा नदी प्रवाहीत झाली असून खेडसह शिरूर तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरासह सह्याद्रीच्या डोंगररांगावर पावसाच्या हलक्या सरी वगळता जून महिना संपला तरी पावसाने काहीशी दडी जरी मारली असली तरी अधूनमधून पडत असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत एकूण ८३ मिलिमिटर तर मागील २४ तासांत ४ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान धरण साखळीत हलक्या सरी पडत असल्याने भीमा नदी प्रवाहीत झाली असून मोठा पाऊस झाल्यास धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे. चासकमान धरणात सद्या ७.६५ टक्के इतका पाणी साठा शिल्लक असून पाणी पातळी ६३१.४० मीटर तर एकूण साठा ४३.६१ दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त साठा १६.४२ दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात १९.२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर पाणी पातळी ६३५.३५ मीटर होती. तर एकूण साठा ६८.०० दशलक्ष घनमीटर होता. तर उपयुक्त साठा ४०.८१ दशलक्ष घनमीटर होता.

Back to top button