सरकार बदललं आमच्या बदलीच काय ? | पुढारी

सरकार बदललं आमच्या बदलीच काय ?

दीपक देशमुख; यवत: राज्यातील सरकार बदलले पण आमच्या बदलीच काय असा प्रश्न तहसीलदारांपासून तर तलाठ्यापर्यत सगळ्यांनाच पडला आहे. महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या आमदार गटाने केलेले बंड त्यांनतर राज्यात झालेले सत्तांतर आणि सध्या सुरू असलेली राजकीय जुगलबंदी यात मात्र शासनाच्या विविध विभागात काम करत असलेले आधिकारी आणि कर्मचारी बदलीच्या कात्रीत गुंतले गेले आहेत.

जिल्ह्यातील तलाठी ते तहसीलदार अशा सर्वच बदल्या राजकीय गोंधळात राहून गेल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी संभ्रमात सापडला आहे. मे महिन्याच्या अखेरीस सर्वच विभागातील बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले असून, या वर्षी मात्र महाविकास आघाडीने शासन निर्णय काढत 30 जून पर्यत कोणत्याही बदल्या करू नयेत, असे सांगितले त्यामुळे सर्वच बदल्या रखडल्या. यात जिल्हा स्तरावरील म्हणजे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर जिल्हा प्रमुखांनी देखील आपल्या आस्थापना वरील बदल्या कराव्यात का करू नयेत, याबाबत स्पष्टता या शासन निर्णय मध्ये आली नाही. त्यामुळे तलाठी पोलीस शिक्षक वर्गातील बदल्या रखडल्या गेल्या आहेत.

बदल्या करण्यास उशीर झाल्यानंतर या गोष्टीचा सर्वाधिक फटका सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना बसत असल्याचे दिसून येते.
बदली कुठे होईल याची अनियमितता असते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आता जून संपून जुलै उजाडला असला तरी बदल्याबाबत अजून कसलेही आदेश आले नाहीत. शिवाय नवीन सरकारचा खाते वाटप आणि मग बदल्या होणार या सर्वात संभ्रम असला तरी या वर्षी बदल्या नेमक्या कोणत्या वेळी होणार, असा प्रश्न सध्या तरी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पडला आहे

Back to top button