भरदिवसा घरात घुसून महिलेचे दागिने केले लंपास | पुढारी

भरदिवसा घरात घुसून महिलेचे दागिने केले लंपास

बारामती : पुढारी वृत्तसेवा; माळेगाव बुद्रुक येथील नागेश्वरनगर येथे राहणार्‍या महिलेच्या घरात घुसून दोघा चोरट्यांनी तिचे हात-पाय बंधत घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. घरामध्ये काहीही मौल्यवान वस्तू न सापडल्याने या महिलेच्या पायातील जोडवी चोरट्यांनी काढून नेली. या घटनेत मोठी चोरी झालेली नसली, तरी भर दिवसा घडलेल्या या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तालुका पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 30 जून रोजी ही घटना घडली. संबंधित महिला आपल्या भाच्याला स्कूटीवरून शाळेत सोडून आली. तिच्या सासूबाई घराजवळ असलेल्या डाळिंबाच्या बागेत फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. फिर्यादी घरात अभ्यास करीत बसल्या होत्या. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घराच्या पाठीमागील बाजूने कोणी तरी उडी मारल्याचा आवाज आला. फिर्यादीने जाऊन पाहिले असता पाठीमागील दरवाजावाटे दोघे तरुण आले. त्यातील एकाच्या हातात लोखंडी गज होता. तो दाखवत त्यांनी फिर्यादीला, ‘आरडाओरडा केला, तर मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. दुसर्‍या व्यक्तीने त्यांचे तोंड दाबून ठेवले.

त्यानंतर ओढणीने त्यांचे तोंड बांधण्यात आले. बेडरूममध्ये जात सर्व साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले. काहीच मिळत नसल्याने पायातील जोडवी व कानातील रिंगा बळजबरीने काढून घेण्यात आल्या. त्यानंतर ‘घरात काहीच नाही. पण, आपली दोन दिवसांची सोय झाली आहे, चल निघू,’ असे म्हणत ते बाहेर गेले. बांधून ठेवलेल्या अवस्थेत फिर्यादी तेथेच होती. चुलत सासू काही वेळाने तेथे आल्यानंतर त्यांनी तिची सुटका केली. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले आहेत.

Back to top button